कोलकाता : रुदाली, हजार चौरासी की माँ अशा गाजलेल्या चित्रपटांपाठी दडलेल्या शब्दांची जननी... समाजातील पीडित-शोषितांची बाजू लावून धरत अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहिलेल्या ख्यातनाम लेखिका महाश्वेता देवी गुरुवारी काळाच्या पडद्याआड गेल्या. वद्धापकाळाने आणि अनेक अवयव निकामी झाल्याने गुरुवारी पहाटे त्यांनी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कादंबऱ्या आणि लघुकथांतून दडपल्या गेलेल्या गोरगरीब वर्गाचा आवाज आज स्तब्ध झाला. महाश्वेता देवी यांच्यावर २२ मेपासून बी. व्ही. नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते. पहाटे ३ वाजता त्यांची प्रकृती ढासळली. आम्ही आमच्याकडून सर्व ते प्रयत्न केले परंतु ताबडतोब त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन नंतर त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. त्यांनी ३.१६ वाजता शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती नर्सिंग होमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टंडन यांनी दिली. (वृत्तसंस्था)अनेक साहित्यकृती रुपेरी पडद्यावरमहाश्वेता देवी यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींत ‘हजार चौरासी की माँ’, ‘अरण्येर अधिकार’, झांसीर राणी’, ‘अग्निगर्भ’, ‘रुदाली’, ‘सिधु कन्हूर ढाके’ इत्यादींचा समावेश असून, या साहित्याने वंचित, दडपल्या गेलेल्या वर्गाचे अंतरंग उघड केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींनी रुपेरी पडद्यावर स्थानही मिळविले. गोविंद निहलानींनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट ‘हजार चौरासी की माँ’ (१९९८) देवींच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. नक्षलवादी चळवळीत आपल्या मुलाचा का सहभाग होता याची कारणे समजून घेण्यासाठी आईचा झालेला भावनिक संघर्ष या चित्रपटाने दाखविला. १९९३मध्ये कल्पना लाजमी यांनी ‘रुदाली’ चित्रपट दिग्दर्शित केला. महाश्वेता देवींच्या ‘रुदाली’ नावाच्या कादंबरीवर तो आधारित होता. राजस्थानातील उच्चवर्णीयांमधील पुरुषांचा मृत्यू झाल्यावर शोक करण्यासाठी व्यावसायिक रडणाऱ्यांच्या (रुदाली) आयुष्याचा पट या चित्रपटात होता.महिलांच्या हक्कांवर महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या ‘चोली के पिछे’ या लघुकथेवर आधारित ‘गणगोर’ हा अनेक भाषांतील चित्रपट इटालियन दिग्दर्शक इटालो स्पिनेली यांनी तयार केला होता. लेखक, पत्रकार या भूमिकांपलीकडे जाऊन देवींनी आदिवासी आणि शोषितांच्या विकासासाठी काम केले.दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाजमहाश्वेता देवी यांच्या लिखाणात कार्यकर्त्याचा उत्साह होता. पीडित, शोषित व वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढण्याचे साधन म्हणून त्यांनी आपली अभिव्यक्ती वापरली. कार्यकर्त्याची निष्ठा आणि लेखकाचा ध्यास असलेल्या देवी बघताबघता आपल्या कादंबऱ्या आणि लघुकथांतून दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाज बनला. त्यांना त्यामुळे पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कारासह अनेक सन्मान लाभले. देवी यांनी आदिवासी आणि ग्रामीण भागातील वंचितांना मदत केली. हे समाजघटक आपापल्या भागांत विकासकामे करू शकतील यासाठी त्यांनी त्यांना गटागटांमध्ये संघटित केले. आदिवासींच्या कल्याणासाठी महाश्वेता देवी यांनी अनेक संस्थांचीही स्थापना केली होती.महाश्वेता देवींच्या निधनाने अतीव दु:ख झाले. त्या करुणेचा आवाज होत्या.. समानतेचा आणि न्यायाचा आवाज होत्या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानभारताने सद्सद््विवेकाला कायम राखणारी व्यक्ती गमावली. आमच्या काळातील त्या महान लेखिकांपैकी एक होत्या.- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा भारताने महान लेखक व पश्चिम बंगालने महान आई गमावली. माझ्या त्या मार्गदर्शक होत्या. महाश्वेता दी यांना शांती लाभो. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
शब्दांची ‘महाश्वेता’ काळाच्या पडद्याआड
By admin | Published: July 29, 2016 3:04 AM