नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाचा विजय निश्चित करण्यासाठी पुढचे शंभर दिवस भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट मतदान केंद्रावरच (बूथ पातळी) काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत मंडपम् येथे शनिवारी सुरू झालेल्या भाजपच्या दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते संबोधित करत होते.
देशात एक हजार मतदार असलेली एकूण १० लाख ४६ हजार मतदान केंद्रे असून त्यांपैकी सुमारे साडेआठ लाख मतदान केंद्रांवर भाजप पोहोचला आहे. गेल्या लोकसभेत गमावलेल्या १६१ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
प्रथम मतदारांवर भर द्या
nदेशाच्या इतिहासात प्रथमच केंद्रातील सरकारचा कार्यकाळ आरोपमुक्त, विकासयुक्त राहिला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्ष तू-तू, मैं-मैंचे राजकारण करील, अनावश्यक भावनिक मुद्द्यांना जास्त महत्त्व देईल; पण, आम्हांला विकासाच्या आधारावर आणि गरीब कल्याणाच्या कामांवरच भर देऊन मतदारांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत.
nकेंद्रातील सरकारच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळाचा अनुभव घेतलेल्या, पण प्रथमच मतदान करणाऱ्यांची तसेच महिलांची मते मिळविण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
‘भाजप नव्या विक्रमासह विजयांची हॅट्ट्रिक नोंदवेल’
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने मागच्या १० वर्षांमध्ये असंख्य नेत्रदीपक उपलब्धींची नोंद केली असून, त्यांच्या नेतृत्वात २०२४ सालीही भाजप लोकसभा निवडणुकीत विजयांची हॅट्ट्रिक नोंदवून नव्या विक्रमासह सत्तेत येईल, अशी ग्वाही आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी भाजपच्या अधिवेशनाला संबोधताना दिली.