पणजी : उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे येत्या १५ जानेवारीपासून सुरु होणार असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी ६७१ विकास प्रकल्प गेल्या दीड वर्षात पूर्ण केल्याचा दावा राज्याचे हवाई वाहतूकमंत्री नंदगोपाल गुप्ता यांनी केला. देशभरातील सुमारे ६ लाख गावांमधील लाखो भाविकांसह ५ हजार अनिवासी भारतीयही महाकुंभमेळ्यात सहभागी होतील. ७१ देशांचे राजदूत महाकुंभमेळ्याच्या तयारीचे साक्षीदार असून त्रिवेणी तटावर या राष्ट्रांचे ध्वजही फडकावण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मंत्री नंदगोपाल गुप्ता हे गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, इतर मंत्रीगण व गोमंतकीय जनतेला उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने खास निमंत्रण देण्यासाठी गोवा भेटीवर आले असता गुरुवारी त्यांनी दोनापॉल येथे पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘देवाला प्रसाद दाखवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ‘मरिजुआना’बाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मरिजुआना’चा वापर येत्या कुंभमेळ्यातही होईल, असे त्यानी सांगितले.कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने या महा कुंभमेळ्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळाल्याचे ते म्हणाले. देशात चार ठिकाणी कुंभमेळे होतात. परंतु प्रयागराज कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांच्या भावनांचा आदर करुन अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे ते म्हणाले.प्रयागराज येथे दर सहा वर्षांनी महाकुंभमेळा तर दरवर्षी माघमेळा होतो. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने गेल्या दीड वर्षात तब्बल ६७१ मोठी विकासकामे सरकारने केल्याचा दावाही गुप्ता यांनी केला. भाविक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी नऊ उड्डाणपूल बांधले. केवळ १४ महिन्यात १३२५ मिटर लांबीचा चौपदरी उड्डाणपूल बांधण्यात आला, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 9:55 PM