कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम खूप प्रचलित झाले आहे. आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यामुळे ऑफिसला जाण्याच्या तयारीचा, यायचा-जायचा वेळ वाचत आहे. या फावल्या वेळात हे कर्मचारी दुसरीकडे कुठे काम करता येते का हे पाहत आहेत. आयटी क्षेत्रात या दुसऱ्या नोकरीची चर्चा रंगली आहे. असे असताना विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी यांनी हा कंपन्यांसोबत धोका आहे, असे सुनावले आहे.
टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे. यावर प्रेमजी यांनी ही धोकेबाजी असल्याचे म्हटले आहे. ''टेक इंडस्ट्रीमध्ये लोक त्यांच्या कंपनीच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी करतात याबद्दल बरीच चर्चा आहे. स्पष्टपणे ही फसवणूक आहे.'' असे ते म्हणाले. विप्रो चेअरमनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा कंपनीने भूतकाळातील मार्जिनवरील वाढत्या दबावामुळे कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे रोखण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी एक्झिक्युटिव्ह (सी-सूट) लेव्हल मॅनेजर्सना व्हेरिएबल पेचा कोणताही भाग मिळणार नाही, तर नवीन कर्मचाऱ्यांच्या टीम लीडर्सना एकूण व्हेरिएबल वेतनाच्या 70 टक्के रक्कम मिळेल.
अलीकडेच फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने 'मूनलाइटनिंग' पॉलिसी सुरू केली आहे. याअंतर्गत कंपनीच्या मंजुरीनंतर कर्मचारी इतर कामेही करू शकतात. स्विगीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन प्रेमजींच्या मताशी असहमत असल्याचे दिसून आले. 'कार्यक्षेत्रातील हे भविष्य आहे. तेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असून क्रूर नाही' असे ते म्हणाले.