नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावण्याच्या कंपन्यांच्या योजनांना कोविड-१९ विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जबर धक्का दिला असून, ‘वर्क फ्रॉम होम’ यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
२०१९मध्ये कोविड-१९ साथीचा उद्रेक झाल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीचा उदय झाला. आयटी क्षेत्रात ही कार्यसंस्कृती जोमात वाढली आणि रुजलीही. भारतात दुसऱ्या लाटेनंतर साथ ओसरली. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कार्यालयांत बोलावण्याच्या योजना आखल्या. तथापि, अचानक उद्भवलेल्या ओमायक्रॉनमुळे आता या योजनांना खीळ बसली आहे. जगात अन्यत्रही हीच स्थिती आहे.
सूत्रांनी सांगितले की, ओमायक्रॉन विषाणूचा कंपन्यांचे कामकाज आणि नफा यावर काय परिणाम होईल, याबाबत आत्ताच काहीच ठरवता येत नसल्यामुळे बहुतांश कंपन्यांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ ही भूमिका स्वीकारली आहे.
योजना लांबणीवर... ‘गुगल’ची पालक कंपनी अल्फाबेट आयएनसीने कार्यालयांत परतण्याच्या आपल्या योजनेला बेमुदत काळासाठी लांबणीवर टाकले आहे. लक्झरी टाॅयलेट उत्पादक कंपनी लिक्सिल कॉर्प्सचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जीन मोन्टेसॅनो यांनी सांगितले की, बदललेल्या परिस्थितीत कार्यालय म्हणजे काय, याची व्याख्याच आम्ही बदलवत आहोत. फिलिप माॅरीसचे सीईओ जॅक ओलक्झॅक यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीची तुलना केवळ युद्धकालीन स्थितीशीच होऊ शकते. आयन पीएलसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नील मिल्स यांनी सांगितले की, जानेवारीत कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले तर ते किती जोखमीचे ठरेल, याचा विचार करण्याची गरज आहे.