नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारानंतर दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिल्लीत टॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर लगेचच मोबाइल इंटरनेट बंदीचे निर्देश देण्यात आले. कोरोना संकटामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच ऑनलाइन क्लास असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या अनेकविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन क्लास रद्द
पश्चिम दिल्ली भागातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद असल्यामुळे ऑनलाइन क्लास रद्द करण्यात आले. केवळ घरून काम करणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाच इंटरनेट बंदीचा फटका बसला असे नाही, तर यामुळे सामान्य कामकाजही विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर इंटरनेट बंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे.
इंटरनेट बंदीचा पाच कोटी नागरिकांना फटका
इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक ठिकाणचे सामान्य जनजीवनही विस्कळीत झाले आहे. यामुळे दिल्लीत गेलेल्या प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. तसेच या प्रकरणी २०० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचारानंतर पोलिसांनी २२ एफआयआर नोंदवल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.