नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान झालेल्या दोन करारानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर येत्या दोन वर्षांत काम सुरू होण्याची शक्यता आहे.फ्रान्स सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. मोदींच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारतीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल) आणि अरेव्हा यांच्यादरम्यान गत महिन्यात एक करार झाला होता. जैतापूर प्रकल्प पुढे रेटण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक उपाययोजनांवर यात विचार करण्यात आला आहे. अरेव्हाने लॉर्सन अॅण्ड टुब्रोसोबतही एक करार केला होता. याअंतर्गत अणुभट्ट्यांसाठीच्या उपकरणांची निर्मिती केली जाऊ शकते. या करारांमुळे केवळ प्रकल्पास आर्थिक वा तांत्रिक गती मिळणार नाही तर भारतीय नियामक, अणुऊर्जा नियामक बोर्डाच्या दिशानिर्देशानुसार अणुभट्ट्ी परवान्याबाबतच्या मुद्यांवर तोडगा काढण्यासही मदत मिळेल.भारतातील फ्रान्स दूतावासात कार्यरत अणु सल्लागार सुनील फेलिक्स यांनी सांगितले की, अणुभट्टीसाठी लागणारी ५० टक्के उपकरणे भारतात तयार होतील,अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. भारत-फ्रान्स दोन्हींसाठी हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. खर्च प्रति युनिट ६.५० पर्यंत गेल्यास आम्ही पुढे जाऊ शकणार नाही, हे भारताने आधीच फ्रान्ससमक्ष स्पष्ट केले आहे.प्रकल्पाचे काम सुरू होण्याबाबत विचारले असता, येत्या दोन वर्षांत हे काम सुरू व्हायला हवे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दोन वर्षांत सुरूहोणार ‘जैतापूर’चे काम
By admin | Published: June 01, 2015 2:03 AM