मोदी सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलायवलेय खरे परंतू ते कशासाठी याची उत्सुकता विरोधकांसह देशवासियांना लागून राहिली आहे. कोण म्हणतेय एक देश एक निवडणूक, कोण म्हणतेय इंडियाचे भारत करणार, परंतू याबाबत काहीच समोर येत नाहीय. या फक्त चर्चाच आहेत. यातच आता पाच दिवसांचे हे अधिवेशन नव्या संसदेत की जुन्या यावरूनही माहिती समोर येत आहे.
संसदेच्या जुन्या भवनातून १८ सप्टेंबरला विशेष अधिवेशनाची कार्यवाही सुरु होणार आहे. परंतू, १९ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीला नव्या संसदेचा श्रीगणेशा केला जाणार आहे. १९ सप्टेंबरपासून नव्या संसदेत कामकाज सुरु केले जाणार असल्याचे वृत्तसंस्था एएनआयला सुत्रांनी माहिती दिली आहे. हिंदू धर्मात कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या पुजेने होते. यामुळे मोदी सरकार नव्या संसदेतील कामाची सुरुवात ही गणेश चतुर्थीलाच करण्याची तयारी करत आहे.
28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून ती देशवासियांना समर्पित केली होती. संसदेची सध्याची जुनी इमारत 1927 मध्ये पूर्ण झाली होती. ती लवकरच १०० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या इमारतीत सध्याच्या गरजेनुसार जागेची कमतरता भासत होती. यामुळे दोन्ही सभागृहांनी संसदेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारला आग्रह धरणारे ठराव संमत केले होते. यानुसार २०१९ मध्ये काम सुरु झाले होते.
नवीन संसद भवनात भविष्यातील गरजेनुसार 888 सदस्य लोकसभेत बसू शकतील, तर राज्यसभेत 384 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील 543 आणि राज्यसभेतील 250 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे.