बंगळुरु : कर्नाटकमध्ये जेडीएस काँग्रेसची सत्ता असताना नेहमी कुमारस्वामी मनातील सल कार्यकर्त्यांसमोर बोलत असत. एका सभेत तर ते रडले होते. आता सत्ता गेल्यानंतर काँग्रेसचे नेते कुमारस्वामींना दोष देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निगम अध्यक्षांसह सर्व आमदारांना पूर्ण स्वातंत्र्यही दिल्याचे कुमारस्वामींनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारचा पाडाव झाला. जवळपास 15 ते 20 दिवस हे सत्तापालटाचे नाटक सुरु होते. काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामा देत मुंबई गाठली होती. याला भाजपाच्या नेत्यांची फूस होती असा आरोप काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी केला होता. हे आमदार खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहत मुंबई पोलिसांना जीवाला धोका असल्याचे पत्र दिले होते. यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरविली होती. यानंतर काँग्रेसचे डी के शिवकुमार या नाराज आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास दिले नाही. त्यांना रिकाम्या हातांनी माघारी फिरावे लागले होते.
कुमारस्वामी आणि त्यांचा भाऊ यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत या आमदारांनी बंड केले होते. यामुळे व्यथित झालेल्या कुमारस्वामी यांनी सोमवारी एका सभेत भावना व्यक्त केल्या. आपण काँग्रेससाठी गेली 14 वर्षे गुलामासारखे काम केल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने वरिष्ठ पातळीवरील नेते माझ्यासोबत इमानदारीने जेडीएससोबत हात मिळून पाहत होते. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांना हे नको होते, असे कुमारस्वामींनी सांगितले.
काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली. जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी जास्त निधी दिला. काही आमदार पूर्वसूचना न देता भेटण्यासाठी येत होते. त्यांना कधी नकार दिला नाही. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक समस्या सोडविली. मी 14 महिन्यांत जेवढे काम केले तेवढे गेल्या काँग्रेस सरकारनेही केले नाही. या काळात काँग्रेसच्या आमदार क्षेत्रासाठी मी 19 हजार कोटी रुपये निधी दिल्याचे कुमारस्वामींनी सांगितले.