भटिंडा (पंजाब) : गोशाळेत पशुचारा विकण्यास मनाई करण्यात आल्यामुळे ४० वर्षीय ईद मोहम्मद याने गोठ्यातच जाळून घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. धर्माच्या आधारावर चारा विकण्यास मनाई करीत गोशाळेतील कर्मचाऱ्यांनी छळवणूक केल्याचा त्याने आरोप केला आहे.६० टक्के भाजलेला मोहम्मद फरीदकोटच्या गुरू गोविंदसिंग वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची प्रकृती गंभीर असून या प्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय मोनू नावाच्या कर्मचाऱ्याला अटक केली. बालगोपाल गोशाळेच्या कर्मचाऱ्यांनी चारा विकण्यास मनाई केल्यानंतर त्यांच्यासोबत मोहम्मदचा चांगलाच वाद झाला होता. न्यायदंडाधिकाऱ्यासमोर दिलेल्या जबानीत त्याने धार्मिक कारणावरून छळ होत असल्याचा आरोप केला.मोहम्मदने गोशाळेत चारा विकण्यास सुरुवात केली होती, असे तपास अधिकारी करमसिंग यांनी सांगितले. महिन्यापूर्वी त्याला दुकान हलविण्यास सांगण्यात आले होते. सोमवारी मोहम्मदची पत्नी आणि जावयाची मोनूसोबत चांगलीच बाचाबाची झाली होती. मोहम्मद हा गोशाळेत चारा विकण्यास परवानगी देण्यासाठी लाच देत होता, अशी माहिती समोर आली असली तरी गोशाळेचे व्यवस्थापक हिंद राज सिंगला यांनी आरोप फेटाळून लावला.
कामगाराने घेतले गोशाळेतच जाळून
By admin | Published: October 14, 2015 12:45 AM