नवी दिल्ली- देशभरात आज व्हेलेंटाइन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो आहे. प्रेमी युगुलांनी आजचा दिवस खास करण्यासाठी विविध योजनाही आखल्या आहेत. पण अशी काही लोक आहेत ज्यांचा व्हेलेंटाइन्स डेला कडाडून विरोध आहे. देशातील अनेक भागात बजरंग दलासह इतर संघटनांकडून विरोध केला जातो आहे. गुजरातपासून ते तामिळनाडू पर्यंत देशाच्या अनेक शहरात व्हेलेंटाइन्स विरोधात आंदोलन सुरू आहे. चेन्नईमध्ये विविध अंदाजात विरोध दर्शविला. चेन्नईत हिंदू फ्रंटच्या काही कार्यकर्त्यांनी व्हेलेंटाइन्स डेला विरोध करत कुत्रा व गाढवाचं लग्न लावलं. हैदराबादमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली तसंच पोस्टर्स आणि पुतळे जाळून विरोध केला.
गुजरातमध्ये बजरंग दल कार्यकर्त्यांनी जोडप्यांना त्रास देऊन व्हेलेंटाइन्स डेला विरोध केला. अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटच्या काही कार्यकर्त्यांनी जोडप्यांना त्रास दिला. दरम्यान, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. व्हेलेंटाइन्स डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याने तो दिवस साजर करण्याची गरज नाही. दुसरीकडे नागपूरमध्येही व्हेलेंटाइन्स डेला विरोध करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून विरोध दर्शविला. रस्त्यावर कुणीही मुलगा-मुलगी फिरताना दिसले तर त्यांचं लग्न लावून दिलं जाईल, असं त्या कार्यकर्त्यांनी म्हंटलं.
13 फेब्रुवारी रोजी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील हॉटेल व पबमध्ये व्हेलेंटाइन्स डेनिमित्ताने कुठलाही कार्यक्रम न आयोजीत करण्याची धमकी दिली होती. व्हेलेंटाइन्स डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याने तो साजर झालाच नाही पाहिजे, अशी भूमिका बजरंग दलाची आहे. दरम्यान, बजरंग दलासह इतर संघटनांचा विरोध पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.