कोची : मानवी हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली शबरीमालातील भगवान आय्यप्पा मंदिरात प्रवेशासाठी मंगळवारी निघालेल्या कार्यकर्त्यांच्या तुकडीला पोलिसांनी संरक्षण देण्यास नकार दिला. याचवेळी या कार्यकर्त्यांच्या मंदिरातील प्रवेशाला भाजप व उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत विरोध केला होता.तृप्ती देसाई यांनी शबरीमाला मंदिरात प्रवेशाचा केलेला प्रयत्न हा ‘कट’ असल्याचे केरळ सरकारने म्हटले. देसाई व कार्यकर्ते येथील विमानतळावर येताच आम्हाला मंदिरात प्रवेश करायचा असल्यामुळे संरक्षण मागण्यासाठी ते थेट पोलीस आयुक्तालयात गेले.तथापि, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा या २०१८ मध्ये दिलेल्या निकालाचा फेरविचार करणार असल्याचा निर्णय नुकताच घेतला असल्याचे कारण सांगून संरक्षण देण्यास नकार दिला.भाजपचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येतील आय्यप्पा भक्त आणि शबरीमाला कर्म समिती कार्यकर्ते आयुक्तालयाबाहेर जमले व त्यांनी तृप्ती देसार्इंच्या या भेटीच्या निषेधार्थ ‘आय्यप्पा सरनम’ हा मंत्रघोष करू लागले.केरळच्या कार्यकर्त्या बिंदू अम्मिनी या विमानतळावर देसार्इंना जाऊन मिळाल्या. पोलीस आयुक्तालयातून अम्मिनी त्यांच्या वाहनातून काही कागदपत्रे घेण्यासाठी बाहेर आल्यावर त्यांच्यावर कट्टरवादी गटाच्या सदस्याने मिरीची फवारणी केली, असे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला करणारा मुख्य आरोपी श्रीनाथ पद्मनाभन याला अटक झाली आहे.माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने अम्मिनी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला; परंतु १० ते ५० वयोगटातील महिलांना त्यांनी मंदिरात प्रवेशासाठी आदेश आणल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही हे स्पष्ट केले. शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा तृप्ती देसाई यांचा हा कट होता, असा आरोप केरळ देवस्वोम मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी केला.
शबरीमाला प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:36 AM