लखनऊ : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद सोडण्याचा काही प्रश्नच नाही. ती जबाबदारी मी आनंदाने आणि मनापासून पार पाडत आहे, असे अमित शहा म्हणाले. ते येथे सोमवारी वार्ताहरांशी बोलत होते.राज्यसभेवर निवडून गेल्यास शहा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील या बातम्यांना त्यांनी पूर्णविराम दिला. बिहारमधील कोणत्याही राजकीय पक्षाला भाजपाने फोडलेले नाही, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचारी लोकांसोबत नितीश कुमार यांना काम करायचे नव्हते, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्या परिस्थितीत कायम राहावे, असा आम्ही आग्रह धरावा, अशी अपेक्षा होती की काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.अध्यक्षपद मी सोडण्याचा प्रश्नच नाही. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे. मी आनंदी असून, पूर्ण मन लावून काम करीत आहे. तुम्ही लोकांनी (प्रसारमाध्यमे) कृपया मला काढू नये, असे ते म्हणाले. २०१९मध्ये होणाºया लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा अधिक शक्तिशाली बनून पुन्हा सत्तेत येईल, असा आत्मविश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने केलेला विकास आणि उत्तम प्रशासनाच्या बळावर भाजपा २०१४पेक्षाही मोठ्या शक्तीसह सत्तेत येईल; कारण देशात १३ राज्यांत पक्ष सत्तेवर येईल.नरेंद्र मोदी हे देशातील निर्विवाद व लोकप्रिय पंतप्रधान आहेत, असा उल्लेख करून शहा म्हणाले, देशात कुटुंबाचे, जातींचे आणि लांगुलचालनाचे राजकारण सरकारने संपवले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या सरकारला धोरण लकवा झाला होता. प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता व कोणीही सिंग यांना पंतप्रधान समजत नव्हते, असे अमित शहा म्हणाले.
अध्यक्ष म्हणून आनंदाने काम करतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:30 AM