लेकरांसाठी कायपण! मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापानं बनवली 'मिनी ऑटो'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 10:20 PM2019-01-28T22:20:53+5:302019-01-28T22:21:56+5:30
केरळमधील अरुण कुमार यांचा मुलगा माधवकृष्णा यास 1990 मधील रोमॅंटिक म्यूजिकल फिल्म ‘ए ऑटो’ अत्यंत आवडली होती. त्याची इच्छा होती कि त्याच्याजवळही एक अशी ऑटो रिक्षा असावी.
कोची - बाप तो बाप असतो, आपल्या लेकीच्या हट्टासाठी तो काहीही करायची तयारी ठेवतो. आईचं मुलावर अन् बापाचं मुलीवर सर्वाधिक प्रेम असतं. म्हणून तर मुलीला सासरी पोहोचवताना एकीकडे बापाच्या पोटात आनंद मावत नसतो, तर दुसरीकडे तिच्या दूर जाण्यामुळं डोळ्यातलं पाणीही तो थांबवू शकत नसतो. तर मुलाच्या यशानंतर सर्वाधिक हुरळून जाणाराही बापच असतो. केरळमधील अरुण कुमार पुरुशोथमन या बापमाणसानेही असे काही केले कि, जगभरात त्याची चर्चा होत आहे. आपल्या लाडक्या लेकरांसाठी त्यांनी चक्क लहान आकाराची हुबेहुब रिक्षा बनवली. सध्या, सोशल मीडियावर या रिक्षाचे फोटो व्हायरल होत आहेत.
केरळमधील अरुण कुमार यांना 1990 मधील रोमॅंटिक म्यूजिकल चित्रपट ‘ए ऑटो’ पासून रिक्षा बनविण्यासाठी प्रेरणा मिळाली होती. अरुण यांच्या मुलाची इच्छा होती कि त्याच्याजवळही एक तशीच ऑटो रिक्षा असावी. त्याने आपल्या वडिलांना अनेकदा तसे बोलूनही दाखवले. शेवटी वडिलांनी त्यांच्या मनातली सुप्त इच्छा ओळखली. मात्र, अरुण कुमार आपल्या मुलांना लाख रुपयांची मोठी ऑटो रिक्षा देऊ शकत नव्हते. कारण, त्यांचा मुलगा अजून लहान होता. पण, मुलाची हौस भागविण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. आपल्या मुलांसाठी अरुणकुमार यांनी मिनी रिक्षाच बनवली. विशेष म्हणजे अरुण यांनी बनवलेली रिक्षा ही केवळ खेळणी नसून ती मोठ्या ऑटो रिक्षाप्रमाणे धावतेसुद्धा. विशेष म्हणजे ऑटो रिक्षाप्रमाणेच या मिनी रिक्षातही सर्व फंक्शन कार्यरत असून अरुणने स्वत: ही रिक्षा बनवली आहे.
अरुणलाही लहानपणी गाड्यांशी खेळायचा खूप छंद होता. मात्र, घरची परिस्थिती गरीब असल्यानं त्यांनाही लहानपणी अशी खेळणी मिळत नसायची. त्यावेळी, त्यांच्या वडिलांनी एक लहान सायकल अरुण यांना दिली. ती लहान सायकल पाहून अरुण यांनी अनेक लहान-सहान खेळणी बनवली. तर, दहावीत असताना जेसीबी मशिनचे लहानसे मिनी मॉडेलही बनवले होते. त्यामुळे मुलाचा हट्ट पूर्ण करतानाही अरुण यांना त्यांचे बालपण आठवले. आपल्या बालपणीच्या आठवणी आणि धंद यांची सांगड घालून अरुण यांनी मिनी रिक्षा बनविण्यासाठी बाजारातून सामान खरेदी केली. आपल्या हस्तकलेतून त्यांनी ही मिनी ऑटो उभारुन आपल्या मुलांना भेट दिली. त्यानंतर, अरुण यांच्या दोन्ही मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालता. तर, अरुण यांनाही लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. ही रिक्षा बनविण्यासाठी अरुण यांना 7 महिन्यांचा कालावधी लागला असून त्यांनी रिक्षाचे नाव सुंदरी असे ठेवले आहे.
पाहा व्हिडीओ-