नवी दिल्ली: यंदाच्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा 7.3 टक्के इतका राहिल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या परिणामांमधून बाहेर पडली असल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. याशिवाय 2019 आणि 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगानं वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. जागतिक बँकेकडून वर्षातून दोनदा 'साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट' प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग 6.7 टक्क्यांवरुन 7.3 टक्क्यांवरुन जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल. याशिवाय खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदेखील चांगली राहिल, असा अंदाज आहे. जागतिक स्तरावर आर्थिक स्तरावर मुसंडी मारायची असल्यास, भारतानं गुंतवणूक आणि निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं जागतिक बँकेचा अहवाल सांगतो. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. मात्र या परिणामांमधून अर्थव्यवस्था सावरत असल्याचं जागतिक बँकेनं अहवालात नमूद केलं आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा फटका भारतातील गरिबांना बसल्याचा उल्लेखदेखील अहवालात करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.3% वेगानं वाढणार- वर्ल्ड बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 9:19 AM