मुंबई - टीम इंडियाचमा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीनं मैदानाबाहेर घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातील चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना, धोनीच्या आठवणी जागवल्या आहेत. राजकीय नेत्यांनीही धोनीच्या कारकिर्दीचं कौतुक केलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धोनीच्या उत्कृष्ट खेळीचं कौतुक करत माहीली पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी म्हटलंय. धोनीने आपल्या हटके शैलीने लक्षावधी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. भारतीय क्रिकेटला मजबूत करण्यासाठी यापुढेही धोनी आपलं योगदान देईल, पुढील वाटचालीस शुभेच्छा... असे म्हणत धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवणही शहा यांनी केली.
''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,'' धोनीची ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.
धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातूनही त्याच्या खेळीचं आणि कारकिर्दीचं कौतुक करण्यात येतंय. राजकीय वर्तुळातूनही धोनीच्या कारकिर्दीच्या आठवणी जागवत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, धोनीची कर्णधार म्हणून निवड केल्याची आठवणही पवार यांनी सांगितली.