दुबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये आयोजित वर्ल्ड गव्हर्मेंट समिटमध्ये बोलताना विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी जगाला एका नव्या मंत्राची ओळख करून दिली आहे. शब्दांच्या अद्याक्षरांचा वापर करून आपले मत मांडण्यात वाकबगार असलेल्या मोदींनी यावेळी 6 आर चा नवा मंत्र जनतेला सांगितला आहे. पंतप्रधान मोदी सातत्यपूर्ण विकासाच्या व्याख्येसंदर्भात बोलताना म्हणाले की, सध्याच्या काळात या रस्त्यावर चालण्यासाठी सहा महत्त्वपूर्ण पावले टाकावी लागणार आहेत. हे सहा आर म्हणजे रिड्युस, रियुज, रिसायकल, रिकव्हर, रीडिझाइन आणि रिमॅन्युफॅक्चर होय, या सहा पावलांवरून चालले की तुम्ही ज्याठिकाणे पोहोचाल ते रिजॉईस म्हणजे आनंदाचे असेल."
यावेळी मोदी म्हणाले की, " या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून मला निमंत्रित करणे ही केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या देशातील सव्वाशे कोटी नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. संयुक्त अर अमिरातीमध्ये 33 लाख भारतीयांना आपलेपणा मिळाला आहे. त्यासाठी भारत तुमचा कृतज्ञ आहे." यावेळी तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी दुबई हे जगासाठी उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले, ते म्हणाले, तंत्रज्ञानाने एका वाळवंटाचा कायापालट केला आहे. हा एक चमत्कार आहे. विकासासाठी तंत्रज्ञानाच्या वापरात दुबई हे अप्रतिम उदाहरण आहे." मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे -तंत्रज्ञानाचा दुबईमध्ये अप्रतिम वापर - संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपलेपणा वाटतो - तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी व्हावा विनाशासाठी नको - गरिबी, संकटे यांवर विकसाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो. - भारताने नागरिकांसाठी आणलेले आधार कार्ड हे जगातील अशा पद्धतीचे अनोखे पाऊल- भारतातील शेतकऱ्यांचे उत्पादन 2022 पर्यंत वाढवण्यासाठी तंत्रतज्ञानाचा वापर - भारत स्टार्टअपचे नवे केंद्र बनला आहे - आंतरराष्ट्रीय भागीदारीतून साकारणार न्यू इंडियाचे स्वप्न - रिड्युस, रियुज, रिसायकल, रिकव्हर, रीडिझाइन आणि रिमॅन्युफॅक्चर होय, या सहा पावलांवरून चालले की तुम्ही ज्याठिकाणी पोहोचाल ते रिजॉईस म्हणजे आनंदाचे असेल
त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाइनच्या दौ-यानंतर आता संयुक्त अरब अमिराता(यूएई)ची राजधानी अबुधाबीमध्ये दाखल झाल्यानंतर वॉर मेमोरियलमध्ये वाहत अल करमा यांना श्रद्धांजली वाहिली. तेथे मोदींनी अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी दुबईतल्या ऑपेरा हाऊसमधून भारतीयांशी संवाद साधला.ते म्हणाले, भारताला जगात सर्वोच्च स्थान मला मिळवून द्यायचं आहे. 21वं शतक हे भारताचं असेल. नोटाबंदी हे गरिबांनीही योग्य दिशेनं उचललेलं पाऊल असल्याचं मानलं आहे. लोकांच्या आवडीचे नव्हे, तर फायद्याचे निर्णय घेणं गरजेचं आहे. चार वर्षांत देशाचा आत्मविश्वास वाढला असून, निराशा आणि समस्यांनाही आम्हाला तोंड द्यावं लागलं आहे. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत भारत विकासाचे नवनवे शिखर गाठतो आहे. अबुधाबीमध्येही सेतूच्या स्वरुपात मंदिर निर्माण केलं जातंय. हे मानवी भागीदारीचं उत्तम उदाहरण आहे. अबुधाबीतलं हे मंदिर भव्य असेल.