जिनिव्हा : फायझर व बायोएनटेक यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी मंजुरी दिली. गरीब देशांना ही लस सहज उपलब्ध व्हावी हा त्यामागे हेतू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयामुळे कोरोना लसीच्या आयात व वितरणासाठी तात्काळ परवानगी देण्याकरिता अनेक देशांना मार्ग मोकळा झाला आहे.
जगातील सर्व देशांना कोरोना लसीचे समन्यायी वाटप व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने कोवॅक्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. फायझरप्रमाणे आणखी काही कंपन्यांच्या कोरोना लसीही विकसित होत आहेत. त्यातील काहींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. सुरक्षित व परिणामकारक लसींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी दिलेली मान्यता हा गरीब देशांसाठी आशेचा किरण आहे. लस विकसित करणे, वितरण या गोष्टी गरीब देशांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयांकडे दीपस्तंभाप्रमाणे पाहिले जाते.
श्रीमंत देशांमुळे अन्याय नको
जगातील श्रीमंत देश कोरोना लस उत्पादक कंपन्यांशी लस पुरवठ्याबाबत स्वतंत्रपणे करार करत आहेत. श्रीमंत देशांपेक्षा गरीब देशांत लोकसंख्या अधिक असून, तेथील कोरोनाग्रस्तांना वेळीच लस न मिळाल्यास जगभरात साथ आटोक्यात येण्यास खूप वेळ लागेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
डिसेंबरमध्ये बळींचा आकडा पाच हजारांनी कमी
भारतामध्ये नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यामध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत चार लाखांनी घट झाल्याचे तसेच बळींचा आकडा पाच हजारांनी कमी झाल्याचे दिसून आले. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये देशात १२.३३ लाख नवे कोरोना रुग्ण सापडले होते, तर १३.४५ लाख बरे झाले, तर १५ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत डिसेंबर महिन्यात ७.८५ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले.