पंतप्रधान मोदींना काँग्रेसने दिल्या 'जागतिक पर्यटन दिना'च्या हटके शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 01:55 PM2019-09-27T13:55:10+5:302019-09-27T14:14:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका केली जाते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका केली जाते. आज जागतिक पर्यटन दिन आहे. याच निमित्ताने काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदींवर फोटोच्या माध्यमातून निशाणा साधला. नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या फोटोंचं एक कोलाज ट्विट करून काँग्रेसने मोदींना जागतिक पर्यटन दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसने शुक्रवारी (27 सप्टेंबर) Happy #WorldTourismDay असं म्हणत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. परदेश दौऱ्यादरम्यानच्या मोदींच्या विविध फोटोंचे एक कोलाज काँग्रेसने ट्विट केले आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या 18 फोटोंचा समावेश आहे. तसेच काँग्रेसने WorldTourismDay या हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. विरोधी पक्ष मोदींच्या परदेश दौऱ्यांवर टीका करत असतात. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे असं म्हणत याआधी प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. 'झगमगाट दाखवून आणि रोज पाच ट्रिलियन-पाच ट्रिलियन बोलून किंवा माध्यमांच्या हेडलाईन मॅनेज केल्याने आर्थिक सुधारणा होत नाहीत. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं होतं.
Happy #WorldTourismDay ✈️ pic.twitter.com/pPrRm9xOOn
— Congress (@INCIndia) September 27, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 443.4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. याबद्दलचे बिल एअर इंडियाने काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले होते. मात्र यामध्ये एअर इंडियाने मोदींच्या पाच परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही. मोदींनी मे 2014 पासून 44 आंतरराष्ट्रीय दौरे केले. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं मोदींइतके परदेश दौरे केलेले नाहीत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले असले, तरी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत त्यांच्या दौऱ्यांचा खर्च कमी आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 38 परदेश दौरे केले. यासाठी 493.22 कोटी रुपयांचा खर्च आला. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तुलनेत हा खर्च 50 कोटींनी जास्त आहे.
मोदींनी एकाचवेळी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. एकदा प्रवास सुरू झाल्यावर ते बऱ्याच देशांना भेटी देऊन परततात. त्यामुळेच त्यांनी जास्त देशांना भेटी देऊनही त्यांच्या प्रवासावरील खर्च कमी आहे. 2015 मध्ये मोदींनी एकाच दौऱ्यात उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानला भेटी दिल्या होत्या. मोदींनी त्यांच्या 16 पेक्षा अधिक दौऱ्यांमध्ये एकाहून जास्त देशांना भेटी दिल्या. मोदींनी सहा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी भारतीय हवाई दलाचं बिझनेस जेट (बोईंग 737) वापरलं. या दौऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च आला नाही. मोदी हवाई दलाच्या बोईंग 737 ने नेपाळ, इराण, बांग्लादेश आणि सिंगापूरला गेले होते. व्हीव्हीआयपींसाठी हे विमान वापरलं जातं. याउलट सिंग यांच्या कार्यकाळात एअर इंडिया वनचा वापर बांगलादेश, सिंगापूरसारख्या कमी अंतराच्या प्रवासासाठीही करण्यात आला होता.