नवी दिल्ली: गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी वाढतच चालल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतातील 10 टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के इतकी संपत्ती आहे. या 10 टक्क्यांपैकी 1 टक्का मंडळी इतकी श्रीमंत आहेत की, त्यांच्याकडे देशातील एकूण संपत्तीच्या 51.53 टक्के इतकी संपत्ती आहे. तर 60 टक्के लोकसंख्येकडे केवळ 4.8 टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. दाओसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पूर्वी ऑक्सफॅमचा अहवाल जाहीर होतो. 2018 ते 2022 या काळात भारतातील श्रीमंतांच्या संख्येत प्रत्येक दिवशी 70 जणांची वाढ होईल, असा अंदाज ऑक्सफॅमनं वर्तवला आहे. 2018 मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या 18 नं वाढली. सध्या देशातील अब्जाधीशांची संख्या 119 इतकी आहे. त्यांच्याकडे तब्बल 28 लाख कोटींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे देशातील सध्याच्या कोट्याधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये प्रत्येक दिवसाकाठी 2200 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील 1 टक्का लोकांची संपत्ती गेल्या वर्षभरात 39 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील केवळ 9 टक्के श्रीमंत लोकांकडे असलेली संपत्ती आणि 50 टक्के गरीब लोकांकडे असलेली संपत्ती जवळपास सारखीच आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची आर्थिक प्रगती अतिशय संथगतीनं झाली आहे. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या संपत्ती वाढीचा वेग केवळ तीन टक्के इतका आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारी विचारात घेतल्यास कोट्याधीशांच्या संपत्तीत दर दिवशी 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
श्रीमंतांचा गरीब देश; देशातील एकूण संपत्तीचा निम्मा वाटा अवघ्या 1 टक्के लोकांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:41 AM