नवी दिल्ली : भारतात एक अब्जापेक्षा जास्त लोक इंटरनेटने जोडले गेल्यास केवळ त्यांचे जीवनमानच उंचावणार नाही, तर भारतीयांमध्ये नवोन्मेष आणि कल्पनाशक्तीचा विस्तार होईल व त्यातूनच जग बदलेल. भारतात मिळणाऱ्या संधींबाबत मी अतिशय उत्साहित आहे, असे फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.दूरसंचार मंत्रालयात पर्यायी तंत्रज्ञानासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा आग्रह झुकेरबर्ग यांनी केला असता रविशंकर यांनी तात्काळ सहमती दर्शविली. आम्ही मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकडे खास फेसबुकसोबत काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे. आयटी फेसबुकसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यायी तंत्रज्ञानाशी निगडित औपचारिकता पूर्ण करण्याला गती दिली जाईल, असे रविशंकर यांनी जाहीर केले.