ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. ३१ - जगातील सर्वात उंच इमारत दुबईत असली तर आगामी वर्षांमध्ये हा बहुमान गुजरातमधील सुरतला मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने सुरतमध्ये तब्बल १.२ किलोमीटर उंच इमारत बांधण्याचा प्रस्ताव मांडला असून या कामासाठी सुमारे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
जगातील सर्व उंच इमारत दुबईतील बुर्ज खलिफा ही असून या इमारतीची उंची ८२८ मीटर्स ऐवढी आहे. या इमारतीमध्ये १६० हून अधिक मजले आहेत. दुबईतील पर्यटकांसाठी बुर्ज खलिफा हे प्रमुख आकर्षण ठरले आहे. मात्र आता भारतीयांना सर्वांत उंच इमारत बघण्यासाठी दुबईला जावे लागणार नाही. डायमण्ड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये सध्या बांधकाम व्यवसायाची चलती आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक हरिहर महापात्रा यांनी सुरतमधील खजोड येथे १.२ किलोमीटर उंच (190 हून अधिक मजले) इमारत बांधण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात महापात्रा यांनी स्थानिक जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव मांडला असून जिल्हाधिका-यांनी हा प्रस्ताव गुजरात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्डाकडे पाठवला आहे. याविषयी महापात्रा यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून इमारतीसाठी महापात्रा यांनी सुमारे एक चौरस किलोमीटरची जागा मागितली आहे. 'हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून गुजरात सरकार, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया अशा विविध यंत्रणांनी प्रकल्पाला परवानगी दिल्यावरच या प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल अशी माहिती स्थानिक वरिष्ठ अधिका-यांनी दिली.