चंदिगढ : भारत आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील बाघा सीमेवर उभारलेल्या सर्वात उंच तिरंगा ध्वजाला वाईट हवामानाचा फटका बसला असून, २0 दिवसांत तो दोनदा बदलावा लागला आहे. तब्बल ३६0 फूट उंचीवर लावण्यात आलेल्या एका ध्वजाची किंमत एक लाख रुपये असून, महिन्यातून तीन वा चार वेळा तो बदलावा लागत असेल, तर वर्षाला एकूण ६0 लाख रुपये खर्च येईल. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच अन्य काही सण व उत्सवांच्या वेळीच तो फडकावा की काय, असा विचार सुरू झाला आहे.बाघा-अटारी सीमेवर भारतीय ध्वज उभारण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला होता. जगातील सर्वात उंच भारतीय ध्वज अशी त्याची ओळख होती. पण इतक्या उंचीवर असलेल्या तिरंग्याची देखभाल करणे अवघड होऊ न बसले आहे. तिरंगा ध्वज ५ मार्चला फडकावण्यात आला आणि तीन आठवड्यांच्या आत त्याचे नुकसान झाल्याने तो काढून तिथे नवा ध्वज लावाला लागला. इतक्या उंच असलेला तिरंगा ध्वज प्रामुख्याने जोरदार वाऱ्यामुळे खराब होत आहे. वाऱ्यामुळे त्याचे नुकसान होत असल्याने तो सतत बदलावा लागणार असेल, तर त्यासाठी प्रचंड खर्च येईल, असे देखभाल समितीचे म्हणणे आहे. मुळात त्याचे इतक्या लवकर नुकसान होईल, असा अंदाजच आला नव्हता. सध्या तिथे फडकावण्यासाठी त्या आकाराचे केवळ १२ ध्वज शिल्लक आहेत. (वृत्तसंस्था)पाकिस्तानच्या कुरबुरी हा ध्वज फडकावण्यात आला, तेव्हा पाकिस्तानतर्फे कुरबुरी करण्यात आल्या होत्या. त्यात छुपे कॅमेरे बसवून पाकिस्तानात हेरगिरी केली जात आहे, यापासून असा ध्वज म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, अशा तक्रारी होत होत्या. पण त्यात अर्थातच तथ्य नाही. आता पाकिस्तानच्या तक्रारीही थांबल्या आहेत. मात्र खर्च हाच मोठा प्रश्न बनून राहिला आहे.एका ध्वजाचा खर्च १ लाख रुपये एका ध्वजाचा खर्चच मुळी १ लाख रुपये आहे. यावर उपाय शोधण्यासाठी देखभाल समितीची लवकरच बैठक होणार आहे. पॅराशूटसाठी वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकपासून तिरंगा तयार केल्यास तो अधिक काळ टिकेल, असा अंदाज आहे. त्या फॅब्रिकच्या एका ध्वजासाठी चार लाख रुपये खर्च येईल आणि तो तीन महिने टिकेल, असे भारत इलेक्ट्रिकल्सचे कमल कोहली यांचे म्हणणे आहे. सध्याच्या ध्वज उभारणीचे काम भारत इलेक्ट्रिकल्सनेच केले होते. पर्याय म्हणून एकदा पॅराशूट फॅब्रिकचा ध्वज तयार करून लावावा, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दर महिन्याला चार ध्वज लागणार असतील, तर ६0 लाख रुपये कोठून आणायचे, हा प्रश्न समितीला आहे. पंजाब आणि केंद्र सरकारने हा खर्च उचलल्यास अडचण येणार नाही, त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी नाही, असे समितीचे म्हणणे आहे.
जगातील सर्वात उंच तिरंगा बनला खर्चीक; हवामानाचा फटका
By admin | Published: March 26, 2017 12:46 AM