लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळविलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी अफगाणिस्तानातील संघर्षाचे वार्तांकन करत असताना त्यांची तालिबानींनी हत्या केली. दानिश यांचा मृतदेह तालिबानींनी रेड क्रॉसच्या हवाली केला असून तो लवकरच भारतात आणण्यात येईल. दानिश यांच्या हत्येचा जगभरात निषेध होत असून देशात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
दानिश यांच्या हत्येची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित संघटनांनी केली आहे. तालिबानींनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात दानिश सिद्दिकी गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. अमेरिकेतील कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स या संघटनेने म्हटले आहे की, दानिश यांच्या हत्येची अफगाणिस्तान सरकारने चौकशी करावी. व्हिएन्ना येथील इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट या संस्थेने सांगितले की, दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूमुळे पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये यंदाच्या वर्षी हत्या झालेले दानिश सिद्दिकी हे पाचवे पत्रकार आहेत.