मुंबई - भारतीय नौसेनेतील जवान आणि गोल्डन ग्लोब रेसचे भारतीय प्रतिनिधी कमांडर अभिलाष टोमी यांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर अभिलाष हे दक्षिण हिंद महासागरच्या जवळपास वादळी वाऱ्यामुळे जखमी झाले होते. मात्र, अभिलाष यांचा जीव वाचविण्यासाठी भारतीय नौसेना, आयएनएस सातपुडा आणि ऑस्ट्रेलियाच्या नेव्ही दलाने संयुक्त ऑपरेशन चालवले होते. अभिलाष यांच्यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत होत्या.
कमांडर अभिलाष सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात आले आहे. अभिलाष यांच्याशी संपर्क झाला तेव्हा, आपण जखमी असून बचावासाठी एका स्ट्रेचरची मागणी केली होती. गोल्डन ग्लोब रेस नौकायन ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून या स्पर्धेत जगभरातील नावाजलेले नाविक सहभागी होतात. यंदा 1 जुलै रोजी ही स्पर्धा फ्रान्स येथून सुरू झाली होती. मात्र, या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर अभिलाष यांचा जीव धोक्यात आला होता. त्यानंतर, अभिलाष यांच्यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत होत्या.
दरम्यान, निर्मला सितारमण यांनीही ट्विट करुन अभिलाष यांचा जीव वाचल्याबद्दल जीव भांड्यात पडल्याचे म्हटले आहे. आता मी सुटकेचा निश्वास घेतला, कमांडर अभिलाष टोमी यांना फ्रेंच फिशिंग जहाँजाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर प्राथमिक व गरजेनुसार उपचार सुरू आहेत. आयएनएस सातपुडाच्या दलामार्फत लवकरच त्यांना पुढील उपचारासाठी मॉरिशिअसला नेण्यात येईल, असे ट्विट संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी केलं आहे.