कानपूर: सध्या उत्तर प्रदेशातडेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियाची दहशत पसरली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढताच हे जीवघेणे साथीचे आजार पसरत आहेत. अलीकडेच फिरोजाबादमध्ये 50 पेक्षा जास्त मुलांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. फिरोजाबादमधील इतक्या मृत्यूंमुळे सरकारही हादरलंय. यानंतर सीएम योगी यांनी स्वतः फिरोजाबादला भेट देऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांना भेटले आणि परिस्थितीची पाहणी केली.
स्क्रब टायफसने संक्रमित
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गादरम्यान, उत्तर प्रदेशात गूढ आजारामुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत राज्यात 60 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यात फिरोजाबादमधील 50 तर मथुरेतील 12 जणांचा समावेश आहे. या गूढ आजाराला 'स्क्रब टायफस' म्हणून ओळखले जाते. मथुरा आग्रा, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा आणि कासगंजमध्ये या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
स्क्रब टायफस कसा पसरतो?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) नुसार, स्क्रब टायफस ताप ''ओरिएंटिया सुत्सुगामुशी'' नावाच्या बॅक्टेरियामुळे होते. हा जीवाणू संक्रमित चिगर (लार्वा मायट्स) च्या चाव्याव्दारे पसरतो. स्क्रब टायफसमधील लक्षणे चिगर चावल्यानंतर 10 दिवसात पसरतात. या लक्षणांमध्ये ताप, गळणारे नाक, डोकेदुखी, शरीर आणि स्नायू दुखणे, चिडचिडेपणा, अंगावर पुरळ यासारखी लक्षणे आहेत.
झाशीमध्ये दररोज 150 ते 200 लोक आजारी
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये घरोघरी साथीचा आजार पसरलाय. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वांनाच ताप आणि सर्दीनं ग्रासलयं. झाशीत दररोज या साथीच्या आजाराचे 150 ते 200 रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयात स्वतंत्रपणे डेंग्यू वॉर्ड बनवण्यात आला आहे. रुग्णालयात प्रत्येक रुग्णाच्या प्लेटलेटची तपासणी केली जात आहे. तसेच, सरकारकडून वारंवार सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात येतोय.