ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू असतानाच राज्यात घातपात घडवून आणण्यासाठी 300 दहशतवादी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे डीजीपी के. राजेंद्र यांनी ही माहिती दिली आहे.
शनिवारी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राजेंद्र यांनी ही खळबळजनक माहिती दिली आहे. राजेंद्र म्हणाले, " राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राज्यात सुमारे 300 दहशतवादी सक्रिय आहेत. तसेच सीमारेषेवरून सातत्याने होत असलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे ही चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी पुढच्या दोन-तीन महिन्यांसाठी धोरण ठरवावे लागणार आहे."
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हान वानी याला लष्कराने ठार मारल्यापासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या गोळीबारामुळे परिस्थिती अधिकच चिंतनीय झाली आहे.