नवी दिल्ली : देशात १२९ दिवसांनंतर प्रथमच एकाच दिवसात कोरोनाचे १,००० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. काही महिन्यांमध्ये रुग्णसंख्या घटल्यानंतर आता पुन्हा या विषाणूने डोके वर काढल्यामुळे चिंता वाढविली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ५,९१५ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे १,०७१ रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५,३०,८०२ झाली आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या ४.४६ कोटींवर पोहोचली आहे.
काेराेनाचा नवा सब व्हेरिएंट एक्सबीबी १.१६ हा या रुग्णवाढीमागे कारणीभूत असू शकताे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे आकडेवारी सांगते. हा व्हेरिएंट राेगप्रतिकारक शक्तीला चुकवू शकताे.
ही खबरदारी घ्या... - खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. - खोकताना व शिंकताना हातरुमाल किंवा कपड्याने तोंड झाकून घ्या. आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुऊन काढा. - रुग्णांनी पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे. धूम्रपान टाळावे. - लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या आहारात घ्याव्यात, असे तज्ज्ञांनी सांगितले.