लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑक्टोबरमध्ये देशातील तब्बल ५४.६ लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या हंगामात लोकांकडे रोजगार नसणे ही चिंताजनक बाब आहे.
देशातील रोजगाराच्या स्थितीचा मासिक आढावा सीएमआयईने एका अहवालाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये ४०६.२४ दशलक्ष लोकांकडे रोजगार होता. ऑक्टोबरमध्ये हा आकडा घटून ४००.७७ दशलक्ष झाला. राष्ट्रीय श्रमशक्ती सहभागिता दर सप्टेंबरमध्ये ४०.६६ टक्के होता. तोही ऑक्टोबरमध्ये घटून ४०.४१ टक्के झाला.
सीएमआयईने म्हटले की, सणासुदीच्या हंगामात रोजगारात वाढ होईल, असा अंदाज होता. तथापि, तसे होऊ शकले नाही. रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे भाकित काही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले होते. तथापि, तसे होताना दिसून आले नाही. जानेवारीमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ६.५२ टक्के होता. त्यात खेड्यातील बेरोजगारी ५.८१ टक्के आणि शहरातील बेरोजगारी ८.०९ टक्के होती.
शहरापेक्षा ग्रामीण भागातील दर जास्तरोजगाराच्या बाबतीत शहरातील स्थिती तुलनेने चांगली असून, ग्रामीण भागातील स्थिती वाईट आहे. ऑक्टोबरमध्ये शहरातील बेरोजगारी १.२४ टक्क्यांनी घटली आहे. ग्रामीण भागात मात्र बेरोजगारीचा दर १.७५ टक्क्यांनी वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण बेरोजगारीचा दर वाढून ७.७५ टक्के झाला. सप्टेंबरमध्ये तो ६.८७ टक्के होता. बेरोजगारीत वाढ होण्याचा दर शहरात घसरून ७.३८ टक्के झाला. हा तीन महिन्याचा नीचांक आहे. ग्रामीण भागात मात्र तो वाढून ७.९१ टक्के झाला असून, हा चार महिन्याचा उच्चांक आहे.