नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलमध्ये होत असलेली भरमसाट भेसळ आणि रॉकेलची चोरी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिंता व्यक्त केली. भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने शपथपत्राद्वारे द्यावी, असे न्यायालयाने सॉलिसिटर जनरलना सांगितले. ग्रामीण आणि नागरी भागात पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ असते, असे सांगून न्यायालयाने हे सगळे रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार हे सहा आठवड्यांत स्पष्ट करा, असे सरकारला सांगितले. भेसळयुक्त पेट्रोल रोखण्यासाठी भेसळीची माहिती देणारी यंत्रेच तयार करता येतील का, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्र सरकारला केली. उत्तर प्रदेशातील सदाबादचे आमदार देवेंद्र अग्रवाल यांच्यावर पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ केल्याचा आरोप असून, त्याची चौकशी करण्याचाही न्यायालयाने आदेश दिला.दिल्ली व एनसीआरमधील पेट्रोलपंपांवर होणारी पेट्रोल, डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने गेल्या जुलैमध्ये पेट्रोलियम मंत्रालयाला चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)
पेट्रोल व डिझेलमधली भेसळ चिंताजनक- कोर्ट
By admin | Published: August 27, 2016 4:25 AM