नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील सर्वांत कमकुवत असे सध्याचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी एकीकडे रालोआला अहेर दिला; तर दुसरीकडे शौरींनी केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. लोक जो विचार करतात त्यापेक्षा त्यांचे मत भिन्न आहे, असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सरकारच्या वतीने आरोप फेटाळून लावले.रालोआ सरकारकडे वारशाने चालत आलेल्या आव्हानांची लोकांना जाण आहे. या सरकारच्या काळात कोणताही घोटाळा, गैरव्यवहार किंवा एखादी चूक घडल्याचा एकही प्रसंग नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. शौरींचे ते वैयक्तिक मत आहे. देशाचे मत त्यापेक्षा भिन्न आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदींना पाठिंबा आहे. भाजपाने एकापाठोपाठ निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावला आहे, असे नायडूंनी स्पष्ट केले. काही लोक म्हणतात असहिष्णुता वाढली आहे. मतदारांनी जनतेला दिलेला जनादेश विरोधकांना पचवता येणे अवघड झाले आहे. विरोधकच असहिष्णू बनले आहेत, असा टोलाही नायडू यांनी हाणला. गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शौरी सोमवारी एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी म्हणाले की, सध्या अवलंबण्यात येत असलेले आर्थिक मार्ग, दिल्या जात असलेल्या हेडलाईन्स पाहता लोकांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळातील दिवस आठवू लागले आहे. ‘डॉक्टर सिंग को लोग याद करने लगे है’ काँग्रेस आणि गाय हेच सरकारच्या धोरणाचे वैशिष्ट्य ठरू लागले आहे. मी यापूर्वी एवढे कमकुवत पंतप्रधान कार्यालयाला बघितले नाही.
हे तर आजवरचे सर्वांत कमकुवत पीएमओ
By admin | Published: October 28, 2015 1:59 AM