हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानच्या बाजूने २०१५ व त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी घुसखोरींमध्ये खूपच वाढ झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केले आहे. २०१६ या कॅलेंडर वर्षात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी यात २०१५ वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. गृहमंत्रालयाच्या २०१६-२०१७ वर्षाच्या वार्षिक अहवालात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी कमी झाली होती; परंतु ती फार मोठ्या प्रमाणावर २०१६ मध्ये (तक्ता पाहा) वाढली, असे म्हटले. २०१६ मध्ये दहशतवादी घटनांमध्ये २०१५ च्या तुलनेत एकदम वाढ झाली. मागच्या वर्षी ३२२ दहशतवादी हल्ले झाले होते, तर त्या आधीच्या वर्षी ते २०८ होते. २०१६ मध्ये सुरक्षा दलांचे कर्मचारी ठार मारले जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सततचा हिंसाचार आणि दहशतवादासाठी या अहवालात पाकिस्तानला पूर्णपणे दोष दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १९९० मध्ये अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली तेव्हापासून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत १३ हजार ९३६ नागरिक व पाच हजार ४३ सुरक्षा दलाचे कर्मचारी ठार झाले आहेत. २०१६ या वर्षात पाकिस्तानच्या डावपेचांत बदल झाल्याचे दिसले, असे अहवाल म्हणतो. त्याने ‘नागरी विरोधा’वर मूलतत्त्ववादी विचार लादले. त्यासाठी हितसंबंधी गटांनी मूलतत्त्ववादी विचारांचा व समाजमाध्यमांचा वापर केला. असे असले तरी खोऱ्यात परिस्थितीत सुधारणाच होत आहे. प्रत्येक सरकारने वेगवेगळे उपाय राबविल्यामुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये विशेष पॅकेजची घोषणा केल्यामुळे खोऱ्यात शांतता परत निर्माण होईल, अशी सरकारला आशा आहे.
दहशतवादाच्या आघाडीवर २०१६ वाईट
By admin | Published: May 12, 2017 12:03 AM