गुगल मॅपने चुकीचे रस्ते दाखविल्याने बिहारमध्ये काही लोकांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशाच अनेक घटना आहेत. यामुळे गुगल मॅपवर पूर्णपणे विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. असाच अनुभव आसाममध्ये छापा मारण्यासाठी जात असलेल्या पोलिसांना आला आहे. पुढे त्यांच्यासोबत जे घडले ते देखील गंमतीशीर असले तरी तेवढेच गंभीरही आहे.
पोलिसांची एक टीम साध्या वेशात आसाममध्ये छापा मारण्यासाठी जात होती. त्यांनी लोकेशन लावले, पण त्यांना गुगल मॅपने थेट नागालँडला पोहोचविले. तेथील लोकांनी त्यांना अत्याधुनिक शस्त्रांसोबत पाहिले आणि हे दरोडेखोर किंवा दहशतवादी असतील असे समजून त्यांच्यावर हल्ला करत कोंडून ठेवले.
हे आसामचेच पोलीस होते. परंतू छापा मारण्यासाठी हे १६ पोलीस निघाले होते. गुगल मॅप दाखवेल तसा ते रस्ता पकडत गेले आणि नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात पोहोचले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारी रात्री हा प्रकार घड़ला आहे.
हा चहाच्या बागेचा परिसर होता, जो गुगल मॅप्सवर आसाममध्ये दाखवण्यात आला होता. तथापि, तो प्रत्यक्षात नागालँडच्या सीमेवर होता. जीपीएसवर गोंधळ असल्याने, गुन्हेगाराच्या शोधात पथक नागालँडच्या आत गेले. स्थानिकांनी त्यांच्याकडील शस्त्रे पाहून ते गुन्हेगार असतील असे समजून त्यांच्यावर हल्ला करत बांधून ठेवले. अखेर नागालँडच्या पोलिसांना हा प्रकार समजला तेव्हा त्यांची सुटका झाली.