चेन्नई- द्रविड मुन्नेत्र कळघमचे दिवंगत नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे निधन झाले. त्यानंतरही त्यांच्यासंदर्भातील अनेक चर्चा सुरु आहेत. करुणानिधी यांच्यानंतर द्रमुक पक्षाची धुरा कोण सांभाळणार यावरुन त्यांच्या मुलांमध्ये ओढाताण सुरु आहे. त्यातच स्टॅलिन यांनी अण्णाद्रमुक सरकारविरोधात थेट आरोप करण्यास सुरुवात केली आहे. जर करुणानिधी यांच्या मरिना किनाऱ्यावरील दफनविधीला परवानगी मिळाली नसती तर मी स्वतःला जमिनीत पुरुन घेतलं असतं असे विधान स्टॅलिन यांनी केले आहे.सुरुवातीला तामिळनाडू सरकारने करुणानिधींच्या दफनविधीला मरिना समुद्रकिनारा येथे जागा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने मरिना येथेच दफनविधी करण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर करुणानिधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. द्रमुकची न्यायलयीन प्रकरणे हाताळणाऱ्या चमूला याचे श्रेय द्यायला हवे, जर परवानगी मिळाली नसती तर करुणानिधींच्या ऐवजी मी स्वतःला मरिना येथे गाडून घेतलं असतं असे विधान स्टॅलिन यांनी पक्षाच्या बैठकीत केले. केवळ सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्याचेच दफनविधी मरिना येथे व्हावेत असा काहीही नियम नाही असे सांगून मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडे दफनविधीची परवानगी मागितली होती असेही स्टॅलिन यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.