नवी दिल्ली - देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा असं वादग्रस्त विधान कर्नाटक सरकारमधील मंत्री बी. सी. पाटील यांनी केलं आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींना आवाहन करणार आहोत. तसेच असा कायदा आणण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
देशविरोधी घोषणाबाजी केल्यास अशी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी एक केंद्रीय कायदा असावा असं बी. सी. पाटील यांनी सांगितलं. यासंदर्भात विचारणा केली असता ''केंद्र सरकारने देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तरतूद असणारा कायदा केला पाहिजे. देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार'' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'देशामध्ये हे लोक आपल्या अन्न, पाणी आणि हवेचा आनंद घेतात आणि पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी करतात. काही तरुणांसाठी अशा प्रकारे देशविरोधी घोषणाबाजी करुन लोकप्रियता मिळवणे ही एक फॅशन बनली' असल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात सीएए-एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी अमूल्या लिओना नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन गोंधळ उडवून दिला होता. या सभेला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसी यांनी अमूल्या हिच्या घोषणाबाजीला विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. तसेच तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बी. सी. पाटील यांनी अशा लोकांना त्वरित गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence: दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचं सावट; रविवारी रात्री 'त्या' दोन तासांत काय घडलं?
दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या
कोरोनाचे संकटही भारतासाठी इष्टापत्ती, निर्यात बाजारात चीनची जागा घेण्याची संधी
तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू