नवी दिल्ली : भारतीय कुस्तीतील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटू बजरंग पुनिया याने शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याने पंतप्रधानांना पत्र लिहिले.
त्याने हे पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही. यावेळी त्याने आपले पद्मश्री पदक रस्त्यावर ठेवले होते. शेवटी त्याने सोशल मीडियावर हे पत्र पोस्ट केले. पुनियाला २०१९ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी शुक्रवारी साक्षी मलिक यांच्या निवासस्थानी गेल्या. तेथे त्यांनी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा केली. या लढाईत कुस्तीपटूंना साथ देण्याचा शब्द त्यांनी दिला.
आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावे का? पत्रात केला सवालnब्रिजभूषण यांच्याविरोधातील पहिले आंदोलन सरकारच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. तीन महिने उलटूनही एफआयआर दाखल न झाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागले. आंदोलन ४० दिवस चालले. nआमचे आंदोलनाचे स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हा आमची पदके गंगार्पण करण्याचा विचार केला होता; पण आम्हाला प्रशिक्षक व शेतकऱ्यांनी तसे करू दिले नाही. त्याचवेळी तुमच्या एका मंत्र्याचा फोन आला. त्यांनी आम्हाला परत येण्यास सांगितले.nआम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन थांबवले. २१ डिसेंबर रोजी ब्रिजभूषण पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यांनी ‘आपले वर्चस्व आहे आणि कायमच राहील’ असे विधान केले.
‘आम्ही सर्वांनी रडत रात्र काढली. कुठे जावे, काय करावे समजत नव्हते. सरकार व लोकांनी खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?’ अशी भावना पुनियाने या पत्रात व्यक्त केली.