Wrestler Protest: 'राज्याभिषेक पूर्ण झाला, अहंकारी राजा'; पैलवानांच्या आंदोलनावरुन राहुल गांधीची PM मोदींवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 04:41 PM2023-05-28T16:41:47+5:302023-05-28T17:16:24+5:30
Wrestler Protest : जंतरमंतरवरील पैलवानांना पोलिसांनी पकडल्यानंतर राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला.
Wrestler Protest: रविवारी (28 मे 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन करण्यात आले. यासोबतच दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. पैलवानांचा तंबूही काढून टाकण्यात आला. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्याभिषेक पूरा हुआ - 'अहंकारी राजा' सड़कों पर कुचल रहा जनता की आवाज़! pic.twitter.com/9hbEoKZeZs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2023
राहुल गांधी यांनी ट्विटरवर कुस्तूपटूंना पोलीस पकडत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच म्हणाले की, "राज्याभिषेक पूर्ण झाला - 'अहंकारी राजा' रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे." नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आणि भाजप सरकारमध्ये वाद सुरू होता. नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधकांची इच्छा होती.
प्रियंका गांधीची टीका
कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, ''खेळाडूंच्या छातीवरील पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की, सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज बुटाखाली पायदळी तुडवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. सरकारचा अन्याय संपूर्ण देश पाहत आहे.''
मल्लिकार्जुन खर्गेंनीही ट्विट पाठिंबा दिला
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईबाबत ट्विट केले आहे. कुस्तीपटूंना पाठिंबा देत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- ''नव्या संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून काढून घेण्यात आला, महिला खेळाडूंना रस्त्यावर हुकूमशाहीने मारहाण करण्यात आली! भाजप-आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे तीन खोटे आता देशासमोर उघड झाले आहेत. 1. लोकशाही, 2. राष्ट्रवाद, 3. बालिका वाचवा....मोदीजी लक्षात ठेवा.''