महिला कुस्तिपटूंच्या लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून भारतीयकुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत असलेल्या कुस्तिपटूंनी शेतकरी, खाप आणि कर्मचारी संघटनांच्या बैठकीमधून सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. जेव्हा आमच्या सगळ्या मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघेल तेव्हाच आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊ.
आशियाई क्रीडा स्पर्धा यावर्षी चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात आयोजित होणार आहेत. तर या स्पर्धेसाठी ३० जूनपूर्वी खेळाडूंची निवड होणार आहे. या महापंचायतीमध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनिया, साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियान आणि विनेश फोगाटचे पती सोमवीर राठी हे उपस्थित होते. हे कुस्तीपटू खाप पंचायतींसोबत मिळून महापंचायत करत आहेत.
या महापंचायतीमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सांगितले की, १५ जूनपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही तर १६ आणि १७ जून रोजी पुन्हा एकदा या प्रकरणी चर्चा करून आंदोलनाची रणनीती बनवली जाईल. तर ऑलिम्पिक पदविजेत्या साक्षी मलिकने सांगितले की, आमच्या सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाल्यानंतरच आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ.