Wrestler Protest : विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वात कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या एका महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. पण, आता या तिघांनी आपल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीवर परतले असले तरीदेखील पैलवानांचा विरोध कायम राहणार आहे. साक्षी मलिकने याबाबत ट्विट करुन माहिती दिली.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर रेल्वे मुख्यालयाच्या रेकॉर्डनुसार, हरिद्वारमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर दुसऱ्याच दिवशी, 31 मे रोजी साक्षी बडोदा हाउस ऑफिसमध्ये नोकरीवर परतली. साक्षीने नोकरी जॉइन करताच रेल्वे इंटर डिव्हिजन चॅम्पियनशिपलाही मान्यता दिली आहे. साक्षी, विनेश आणि बजरंग OSD स्पोर्ट्स पदावरर कार्यरत आहेत.
पैलवानांची लढाई सुरूच राहणार''माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. सत्याच्या लढाईतून आम्ही माघार घेतली नाही आणि घेणारही नाही. सत्याग्रहासोबत रेल्वेतील जबाबदारी निभावणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरू राहणार,'' असे ट्विट साक्षीने केले.
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारले होते. पैलवान 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याआधी जानेवारीमध्येही कुस्तीपटूंनींनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू परतले.
ब्रिजभूषण यांच्यावर दोन गुन्हे दाखल7 महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण विरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले. पहिली एफआयआर अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणांचा पोलिस तपास सुरू आहे.
कुस्तीपटूंनी अमित शहा यांची भेट घेतली दरम्यान, शनिवारीच कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. कुस्तीपटू साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियन यांनी आजतकशी बोलताना या भेटीची पुष्टी केली होती. या बैठकीला तेही उपस्थित होते. बैठकीत कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी उचलून धरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही बैठक अनिर्णित राहिली. गृहमंत्र्यांकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असे त्यांनी सांगितले. पण, आता आज कुस्तीपटूंनी आपापल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.