दिल्ली: हत्या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला ऑलिंपिक पदक विजेता पहेलवान सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. पोलिसांनी सुशील कुमारच्या साथीदारालादेखील अटक केली आहे. एका हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुशील कुमारला पकडण्यासाठी पोलिसांनी पंजाबमधील भटिंडा, मोहालीसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. दिल्लीतल्या काही ठिकाणांवरदेखील पोलिसांनी धाडी टाकल्या. मात्र सुशील कुमार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर आज सकाळी सुशील कुमारला अटक करण्यात आली. हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुशील कुमारचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणा छापे टाकले. मात्र एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे सुशील कुमार जागा बदलत होता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणं अवघड जात होतं. अखेर आज सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं सुशील कुमारला अटक केली. सुशील कुमार गेले काही दिवस विविध नंबर्सच्या माध्यमातून त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांची अनेक पथकं त्याचा शोध घेत होती. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारवर १ लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. तर त्याचा साथीदार अजयची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पोलीस निरीक्षक शिवकुमार आणि कर्मबीर यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष पथकानं सुशील कुमारला अटक केली. सहायक पोलीस आयुक्त अत्तर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.