sourav ganguly | नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध पैलवानांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. आज या आंदोलनाचा तेरावा दिवस असून विविध राजकीय पक्ष आंदोलक पैलवानांची भेट घेत आहेत. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. राजकीय मंडळींनी राजकारण न करता आमची बाजू मांडावी असे पैलवानांचे म्हणणे आहे. भारतात क्रिकेटची पुजा केली जाते पण क्रिकेटपटू आमच्यासाठी का बोलत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला.
भारतीय संघाचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव, हरभजन सिंग, इरफान पठाण यांच्यासह अनेकांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला होता. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा देखील पैलवानांसाठी मैदानात उतरला होता. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सावध पवित्रा घेतला.
गांगुलींची सावध भूमिका "त्यांना त्यांची लढाई लढू द्या. तिथे काय चालले आहे ते मला माहीत नाही, मी फक्त वर्तमानपत्रात वाचले. क्रीडा विश्वात मला एक गोष्ट जाणवली की, ज्या गोष्टींची तुम्हाला पूर्ण माहिती नाही त्याबद्दल तुम्ही बोलू नये", असे गांगुली यांनी म्हटले. क्रिकेटच्या दादांची ही भूमिका चाहत्यांना चांगलीच खटकल्याचे दिसते आहे.
सोशल मीडियावर गांगुली ट्रोल
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते सौरव गांगुली यांच्यावर टीका करत आहेत.
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज शुक्रवारी आंदोलनाला तेरा दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"