नवी दिल्ली - महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा, यासाठी लैंगिक छळाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरून हटवून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.
कर्नाटकमध्ये प्रचाराला रवाना होण्यापूर्वी त्या सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. कुस्तीपटूंशीही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. यावेळी महिला कुस्तीपटू भावुक झाल्या होत्या. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्पष्ट केले की, राजीनामा देणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. मात्र, स्वत:वर गुन्हेगाराचा शिक्का मारून घेऊन मी राजीनामा देणार नाही.