हरिद्वार : २३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी आज मोठा निर्णय घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतल्याचे कळते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलक पैलवानांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत, नरेश टिकैत यांच्या मागणीनंतर पैलवानांनी मवाळ भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नरेश टिकैत घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पदकं ताब्यात घेतली आहेत. त्यांनी पैलवानांकडे पाच दिवसांचा वेळ मागितला आहे.
आंदोलक माघारी परतले
शेतकरी नेत्यांची मध्यस्थी
पैलवानांवर गुन्हे दाखल रविवारी एकिकडे नवीन संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं, तर दुसरीकडे या नव्या वास्तूसमोर आंदोलन करू पाहणाऱ्या पैलवानांची दिल्ली पोलिसांनी धरपकड केली. पैलवानांचे आंदोलन दडपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. खरं तर पैलवानांवर दिल्ली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत.
आखाड्याबाहेरील 'कुस्ती' ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला एक महिना झाला असून अद्याप तोडगा निघाला नाही. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. दिल्लीत रविवारी नवीन संसद भवनासमोर आंदोलक करू इच्छित करू पाहणाऱ्या पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याशिवाय विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.