लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गेले महिनाभर आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले ऑलिम्पिक पदकविजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त फेटाळले आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ते रेल्वेत कामावर रुजू झाले आहेत.
३ जूनच्या रात्री विनेश फोगट, बजरंग व साक्षी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त पसरले आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा कोणताच नव्हता.
ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही. आंदोलनाबरोबरच मी रेल्वेतील माझी जबाबदारी पार पाडत आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका. - साक्षी मलिक
आमचे नुकसान करण्यासाठी या बातम्या पसरविल्या जात आहेत. आम्ही आंदोलन मागे घेतले नाही. - बजरंग पुनिया