लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न व अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारला परत केले आहेत. यासंदर्भात विनेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.
ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, डेफिल्म्पिक चॅम्पियन वीरेंद्रसिंह यादव यांनी काही नुकतेच पद्मश्री पुरस्कार परत केले होते. त्यानंतर आता विनेश फोगाट यांनी दोन पुरस्कार परत केले.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. या महासंघाच्या प्रशासकीय मंडळात बृजभूषण शरण सिंह यांच्या निकटवर्तीयांपैकी कोणालाही स्थान मिळू नये, अशी मागणी कुस्तीगिरांनी केली होती. संजय सिंह यांच्या निवडीमुळे कुस्ती सोडणार असल्याचे साक्षी मलिक यांनी जाहीर केले होते.