कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. दिल्लीपोलिसांचे एक पथक सोमवारी रात्री लखनौ आणि गोंडा येथील ब्रिजभूषण सिंह यांच्या घरी पोहोचले. एसआयटीने ब्रिजभूषण सिंहे यांच्या घरी उपस्थित असलेल्या १२ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा
दिल्ली पोलिसांनी पुरावा म्हणून ब्रिजभूषण यांच्या घराची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची नावे, पत्ते आणि ओळखपत्रे गोळा केली आहेत. या चौकशीनंतर पोलिसांचे पथक दिल्लीला परतले. पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
गेल्या काही दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. २१ एप्रिल रोजी ७ महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारींच्या आधारे २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले. पहिली एफआयआर अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणांचा पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत १३७ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
दोन्ही एफआयआरमध्ये आयपीसी कलम 354, 354A, 354D आणि 34 या दोन्ही एफआयआरमध्ये नमूद केले आहे, ज्यामध्ये एक ते तीन वर्षाची शिक्षा आहे. पहिल्या एफआयआरमध्ये ६ कुस्तीपटूंवरील आरोपांचा समावेश असून WFI सचिव विनोद तोमर यांचेही यात नाव आहे. दुसरी एफआयआर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवर आधारित आहे आणि त्यात POCSO कायद्याच्या कलम 10 चीही नोंद आहे, ज्यामध्ये पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास आहे.
दरम्यान, काल काही पैलवानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर पैलवान साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियान यांनी सागितले की, आम्ही शाह यांच्याकडे ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी केली. या बैठकीनंतर सोमवारी पैलवान बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट सोमवारी रेल्वेत त्यांच्या नोकरीवर परतले आहेत.