Wrestlers Protest : आज देशात दोन मोठ्या घटना घडल्या. एकीकडे नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडला, तर दुसरीकडे जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला कुस्तीपटूंना ताब्यात घेतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सायंकाळी या महिला कुस्तीपटूंना सोडून दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी विनेश फोगट, संगीता फोगट आणि साक्षी मलिका यांची कोठडीतून सुटका केली आहे. पण, कुस्तीपटू बजरंग पुनियासह एकूण 4 जणांना पोलिसांनी अद्याप सोडलेले नाही.
फोगट बहिणींचा पोलिसांवर आरोप पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर विनेश फोगटने सांगितले की, पोलिसांनी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि मला सोडले आहे. इतर पैलवान सध्या ताब्यात असल्याचे तिने सांगितले. फोगट भगिनींनी कालकाजी पोलिस स्टेशनच्या उच्च पोलिस अधिकाऱ्यांवर वैयक्तिक मोबाइल फोनमध्ये परवानगी न घेता त्यांचे व्हिडिओ चित्रण केल्याचा आरोप केला आहे.
कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर बीकेयू नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवर अडवले. मात्र, राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांसह सायंकाळी यूपी गेट खाली केले. अलिगडमध्ये पंचायत करणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले.