दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी गुरुवारी पुन्हा एकदा महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. दरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने सलग दुसऱ्या दिवशी नाराजी व्यक्त करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. तिने WFI अध्यक्षांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा जोरदार समाचार घेतला. तसेच ब्रिजभूषण सिंह यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन दोन मिनिटे बोलून दाखवावे. ते समोर बसू शकत नाहीत. आमच्याकडे अशा पीडिता आहेत, ज्यांचं शोषण झालंय. त्या पुराव्यानिशी बसलेल्या आहेत. जर कारवाई झाली नाही तर त्या या प्रकरणात एफआयआर दाखल करतील. जर आमच्या सारख्या कुस्तीपटूंसोबत असं होत असेल तर इतर मुली किती सुरक्षित आहेत. भारतात एकही मुलगी जन्माला येता कामा नये, असे उद्विग्न उदगार विनेश फोगट हिने काढले.
तत्पूर्वी विनेश म्हणाली होती की, आमचे आरोप खरे आहेत. आम्हाला कुस्ती जिवंत करायची आहे. आम्हाला समोर येण्यास भाग पाडू नका. माझ्यासोबत किंवा इतर महिलांसोबत काय घडलंय, हे त्यांना सांगायचे नाही आहे. मात्र आम्हाला सांगण्यास भाग पाडलं तर ते कुस्तीचं दुर्देव असेल. आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, ही आमची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, असे विनेश म्हणाली.
विनेश म्हणाली की, आम्ही पुरावे चव्हाट्यावर आणू इच्छित नाही. आमचे आरोप खोटे नाही आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत आणि पीडिताही आहेत. आम्ही अध्यक्षांच्या राजीनाम्यासोबत त्यांना जेलमध्येही पाठवू. आम्ही फेडरेशनला बंद करण्याची मागणी करत आहोत. कारण फेडरेशन राहिली, तर त्यांचेच लोक काम करतील आणि आम्हाला त्रास देतील.