Babita Phohat Replies To Sakshi Malik: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचेआंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. पण, अद्याप यासंदर्भातील वाद थांबलेला नाही. या प्रकरणात आता दोन महिला कुस्तीपटू आमने-सामने आल्या आहेत. साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांनी एका व्हिडिओतून भाजप नेत्या आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगटवर आरोप केले होते. त्या आरोपांना बबिताने प्रत्युत्तर दिले आहे.
बबिता फोगटने ट्विटरवरुन साक्षी मलिकवर निशाणा साधला आहे. “एक म्हण आहे की, आयुष्यभर तुम्हाला तुमच्या कपाळावरील कलंकाची खूण लपवावी लागते. काल मला माझ्या धाकट्या बहिणीचा(साक्षी मलिक) आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं आणि हसूदेखील आलं. धाकटी बहीण दाखवत असलेल्या परवानगीच्या कागदावर कुठेही माझ्या स्वाक्षरीचा किंवा माझ्या संमतीचा कोणताही पुरावा नाही, तसेच माझा त्याच्याशी दूरस्थपणे काहीही संबंध नाही.”
“मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की, पंतप्रधान आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठएवा, सत्य नक्कीच बाहेर येईल. एक महिला खेळाडू म्हणून मी नेहमीच देशातील सर्व खेळाडूंच्या सोबत होते, सोबत आहे आणि राहीन, पण सुरुवातीपासून मी आंदोलनाच्या बाजूने नव्हते. मी सर्व पैलवानांना वारंवार सांगितलं की, तुम्ही पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांना भेटा, त्यावर तोडगा निघेल. पण तुम्हाला दीपेंद्र हुडा, काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्याकडून तोडगा मिळवायचा होता.''
साक्षीचा पलटवार
बबिता पुढे म्हणाली की, ''जे लोक तुमच्या सोबत येत आहेत, ते स्वतः बलात्कार आणि इतर केसेसमध्ये दोषी आहेत. पण आता देशातील जनतेने विरोधकांचे चेहरे ओळखले आहेत. शेतकरी आणि महिला पैलवानांच्या भावनेतून त्यांनी राजकारणाची भाकरी भाजण्याचे काम केले. त्यांनी तुमच्या आंदोलनाला अशी दिशा दिली, ज्यातून तुमचा राजकीय फायदा असल्याचे लोकांना जाणवू लागले. तुम्ही काँग्रेसच्या हातातले बाहूले झाला आहात. आता देशातील जनतेला समजेल की, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी तुमचा निषेध आणि देशासाठी जिंकलेले पदक गंगेत टाकून देण्याची घोषणा, हे किती लाजीरवाणी बाब होती.''