नवी दिल्ली: दिग्गज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. कुस्तीपटू गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा, भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्यासह अनेक खेळाडूंनी या प्रकरणावर विधाने केली आहे. मात्र, क्रिकेटपटूंसह इतर अनेक स्टार खेळाडूंच्या मौनावर पैलवान विनेश फोगाटने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निराश झालेल्या विनेशने या प्रकरणावर एक शब्दही न बोलणाऱ्या क्रिकेटपटूंना मन नसल्याचे म्हटले आहे.
विनेश क्रिकेटपटूंवर नाराजमीडियाशी बातचीतमध्ये विनेशने देशातील दिग्गज क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुलसारख्या खेळांमध्ये कामगिरी केल्यावर ते आमचे कौतुक करतात, पण आज ते सर्व गप्प आहेत का आहेत? असा प्रश्न विचारला. संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करतो, पण एकही क्रिकेटर काही बोलयला तयार नाही. तुम्ही आमच्या बाजूने बोला असे आम्ही म्हणत नाही, पण किमान तटस्थपणे संदेश द्या आणि कोणत्या एका बाजूने बोला. क्रिकेटपटू असो, बॅडमिंटनपटू असो, ऍथलेटिक्स असो किंवा इतर कुठल्याही खेळातील खेळाडू असतो, त्यांच्या मौनाने आम्हाला त्रास होतोय, असंही ती म्हणाली.
विनेश पुढे म्हणते, अनेक क्रिकेटपटूंनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्स मॅटर आंदोलनादरम्यान त्यांचा पाठिंबा दर्शवला. आमची तेवढीही लायकी नाही का? क्रिकेटपटूंचे मोठ्या ब्रॅंडसोबतच्या करारामुळे गप्प आहेत. आमच्या प्रकरणात विधान केल्याने त्यांच्या करारांवर परिणाम होईल, याची त्यांना चिंता असू शकते. त्यामुळेच आमच्या बाजूने तो बोलत नसावेत. त्यांना 'सिस्टम' ची भीती वाटत असेल. लोक म्हणतात की, पैलवानाचे डोके गुडघ्यात असते, पण मी म्हणेन की आमचे हृदय, डोके, सर्वकाही योग्य ठिकाणी आहे. इतर खेळाडूंनी त्यांचे मन कुठे आहे हे तपासणे आवश्यक आहे. त्यांना अजिबात मन नाही. आज तुम्ही आमच्या बाजूने नाहीत, उद्या आम्ही पदक जिंकल्यावर आमच्यासाठी पोस्ट टाकू नका, असंही ती म्हणाली.
सेहवाग आणि कपिल देव यांचे समर्थनआतापर्यंत दोन क्रिकेटपटूंनी याप्रकरणी वक्तव्ये केली आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लिहिले की, देशाला गौरव मिळवून देणाऱ्या, ध्वज फडकावणाऱ्या, आपल्या सर्वांना खूप आनंद देणार्या आमच्या चॅम्पियन्सना आज रस्त्यावर यावं लागलं, हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब असून त्याची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. खेळाडूंना न्याय मिळेल अशी आशा आहे. तसेच, भारताला 1983 चा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनीही कुस्तीपटूंचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि लिहिले - त्यांना कधी न्याय मिळेल का?